मंगलवार, 25 दिसंबर 2018

आमदार वडकुते तुम्ही दारु पिऊन आलात बाहेर व्हा -मुटकुळे

हिंगोली : हिंगोलीत कोतवालांच्या प्रश्नावर दोन आमदारांची शाब्दिक चकमक उडाली. पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्यासमोर झालेल्या एका बैठकीत भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी राष्ट्रवादीचे आमदार राम वडकुते यांना तुम्ही दारू पिऊन आला आहात का, असा सवाल करत बाहेर जाण्यास सांगितले.हा प्रकार काल हिंगोली विश्रामगृहात घडला. पालकमंत्री दिलीप कांबळे हे काल जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. राज्यभर कोतवालांच्या संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. या संदर्भात कांबळे यांना भेटण्यासाठी वडकुते तिथे गेले होते. तेथे भेटण्यापूर्वी वडकुते यांनी मुटकुळे यांना फोन केला होता. कोतवालांच्या प्रश्नांवर तुम्ही काय निर्णय घेतला आहे, अशी विचारणा वडकुते यांनी मुटकुळे यांना केली. त्यावर पालकमंत्र्यांनी तातडीने राज्य सरकारला याबाबत पत्र लिहिणार असल्याचे मुटकुळे यांनी पलीकडून सांगितले. त्यावर पत्र लिहिण्यातच तुमची पाच वर्षे गेली. आता आणखी किती विलंब लावता, असा टोला वडकुते यांनी लावला. त्यावर तुमच्या सत्तेच्या काळात कोतवाल नव्हते का, असा प्रतिप्रश्न मुटकुळे यांनी वडकुते यांना केला. फोनवरच दोघांचे संभाषण जोरात झाले.त्यानंतर वडकुते हे विश्रामगृहावर गेले. तेथे ते काही बोलू लागताच मुटकुळे यांनी तुम्ही दारू पिऊन आला आहात का, असा सवाल विचारत बाहेर जाण्यास सांगितले. वडकुते यांनी बाहेर येऊन सारा प्रकार माध्यमांना सांगितला. तसेच सत्ताधारी आमदाराला प्रश्नही विचारायचे नाहीत, अशी वेळ आली आहे. मी तर दारूच्या थेंबाला आयुष्यात स्पर्श केलेला नाही. तरी सत्ताधारी आमदार असे बोलत असतील तर त्यांना सत्तेचा माज आला आहे, असेच वाटते. या प्रकारावर मुटकुळे यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें